माढा, दि.
सीना नदीस आलेल्या महापूर परिस्थितीत सामाजिक बांधिलकी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून पुढे आलेल्या माढ्याच्या नगराध्यक्षा ॲड मीनल साठे यांना राजकीय दृष्ट्या कोंडीत पकडण्याचा आमदार अभिजित पाटील यांचा प्रयत्न आमदारांच्याच अंगलट आल्याचे चित्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक निकालातून स्पष्ट झाला आहे .
लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी कार्यरत राहिलेल्या माढ्याच्या नगराध्यक्षा ॲड मीनल साठे यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना डावलल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करत विधानसभेची निवडणूक लढवली त्यात त्यांचा पराभव झाला आणि आमदार अभिजित पाटील हे विजयी झाले या विजयात त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राहिले ते अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे मात्र आपल्या विरोधात ॲड साठे यांनी निवडणूक लढवण्याची सल पाटलांच्या मनात अजूनही कायम असल्याचे जाणवते.
लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या सोबत राहण्याचा मतदारांचा कल हा विधानसभा निवडणुकीत देखील कायम राहिला आणि नगराध्यक्षा ॲड साठे या स्थानिक उमेदवार असतानाही आमदार पाटील यांना माढा शहरातून मताधिक्य मिळाले आणि येथेच नगरपंचायतीचा सुमारे एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असतानाच नगरपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्याची रणनीती डोळ्यासमोर ठेवून राजकीय समीकरणे जुळवण्याची तयारी सुरू झाली त्यात गैर काहीच नाही मात्र अशी समिकरणे जुळवताना मुख्य प्रतिस्पर्धी निवडणूक रिंगणात नसावा अशा पराभूत मानसिकतेतून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मानेगाव जि प गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या दादासाहेब साठे यांना जि प निवडणुकीत पक्षाची उमेदवारी हवी असेल तर येणारी माढा नगरपंचायतची निवडणूक लढवणार नसल्याचे लेखी मागण्याची बालीश अट घालण्यात आली येथेच तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलली.
मानेगाव जि प गटात सीना नदीस आलेल्या महापूराचा सर्वाधिक फटका बसलेल्या गावांचा समावेश होतो विधानसभा निवडणुकीत येथील मतदारांनी आमदार पाटील यांना चांगली साथ दिली होती महापूराची तिव्रता जाणवताच नगराध्यक्षा ॲड मीनल साठे आणि दादासाहेब साठे यांनी क्षणाचाही विलंब न करता सीना नदी काठच्या गावातील सुमारे पाचशे लोकांना माढ्यातील मंगल कार्यालयात निवारा उपलब्ध करून दिला आणि दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा पासून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यावेळी त्यांनी आपपरभाव न पाहता नैसर्गिक आपत्तींमुळे आपदग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्यास प्राधान्य दिले आणि या भागातील जनतेच्या मनात आपुलकीची भावना निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या आणि यातूनच दादासाहेब साठे यांची उमेदवारी जनतेतून पुढे येत असल्याचे चित्र समोर आले.
मात्र माढ्याच्या राजकारणात साठे ज्यांना चालत नाहीत त्यांनी मानेगाव जि प गटातील उमेदवारीचा पेच कसा निर्माण होईल याची व्यवस्था केली अशी व्यवस्था करण्याच्या खेळीत आमदारांचा जि प निवडणुकीतील पराभव दडला होता हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वारसा लाभलेली जी काही घराणी आहेत त्यामध्ये माढ्याच्या साठे घराण्याचा समावेश होतो साठे गटाची शक्ती आहे प्रामुख्याने मानेगाव, टेंभुर्णी आणि उपळाई बुद्रुक या तीन जि प गटा बरोबर लऊळ व रोपळे क पंचायत समिती गणातील निवडणूक निकालावर परिणाम करणारी ठरली तालुक्याचे राजकीय समीकरणच बदलले आणि भाजपाला तालुक्यात विरोधकच राहिला नाही अशी परिस्थिती साठेंच्या निर्णयामुळे निर्माण झाली आणि त्यातूनच आजवर पुरोगामी विचाराचा वसा जपलेल्या माढा तालुक्यात भाजपाचे कमळ फुलले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही


Leave a Reply